नक्षत्रांचे देणे
|जादू|
भारतीय चित्रपट सृष्टीतील तारतारकांचं आपल्या रसिक प्रेक्षकांच्या भावविश्वाशी फार जवळचं आणि चीवट नातं असतं.... देविका राणी पुढे स्वत: कशीही वागली असली तरी तिने या पेशीवरी (तरूण युसुफ खान) सफरचंदाचं केलेलं दिलीप कुमार हे नामकरण रुपेरी पडद्यासाठी आणि पल्याडही नेहमीच इतरांसाठी फलद्रूप ठरलं.... कलावंत तर ते होतेच परंतु माणुस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध रंग लौकिक अर्थाने ते आपल्यात आज नसल्याने आहिस्ता आहिस्ता कळु लागतील....
त्रिशूळाची अग्रे
राज देव आणि दिलीप हे तीन या माया नगरीतील मनोरंजनाचे पाॅवर हाऊसेस चाहत्यांनी स्वीकारल्याने सरस असूनही अशोक कुमार, मोतीलाल, बलराज साहनी आणि किशोर कुमार, शम्मी कपूरलाही सर्व स्वीकारार्हतेसाठी मशक्कत करावी लागली होती.... या तिघांनी कितीतरी दशके अभिनयाचा शो सुरु ठेवून आपली अग्रे बोथट नाही होऊ दिली.. पण काळ पुरूषा मनोमनी नेहमीच वेगळा सिनॅरियो आधी बघत राहिला... यात प्रथम राज नंतर विदेशात देव आणि आता भारताच्या भूमीत युसुफ मियाॅं.... माणूस म्हणून मी यांच्यापेक्षा काकणभर सरस अशा यांच्या धीराच्या..समजूतदार बायकांना म्हणजे श्रीमती कृष्णाजी, कल्पनाजी आणि सायराजी यांना मानतो.... या तिघांचा सांभाळ करताना या तिघींना जो म्हणून त्याग करावा लागला असेल तो मॅचलेसच म्हणावा लागेल....
मौन आणि अभिनयाचा अंडरप्ले कळसाध्याय:
दिलीप कुमार यांच्या सर्वोत्तम हिन्दी चित्रपटाविषयी चाहत्यांची आवड भिन्न असल्याचे लक्षात येईल पण त्यांच्या गंगा-जमुना आणि कोहिनूर या स्वतंत्र स्वभाव धर्माच्या दोन चित्रपटांना सगळेच स्थान देताना दिसतील... यात त्यांच्या अभिनयाचा नितळपणा बघणार्याला जाणवतो....आणि तो आपलासा वाटतो, हे श्रेय बाप दिलीपसाब यांचं!
अगदी साठीनंतर छबिलदास शाळेच्या प्रायोगिक नाटकांच्या मंचावर होणारी नाटके बघताना शुभ्र साध्या पेहरावात अमरीश, अमोलचा अभिनयाचा त्यांनी केलेला अभ्यास बघायला आलेलं मी त्यांना दुरून बघितलंय...
उत्तुंग कड्यावरून या इथल्या मातीच्या प्रमत्त ओढीने झेपावणार्या जल प्रपातासारखे होते ते... जगताना त्यांनी कठोरपणे स्वत:ला माणूस म्हणून तपासून परमावधी गाठली होती. अभिनय हे प्रवासात नंतर येणारं फक्त स्टेशन होतं.
त्यांना जे आयुष्यात मिळवायचं होतं ते त्यांनी मिळवलं तरीही जे ठामपणे हवं होतं ते त्यांना नाही मिळालं... याचं त्यांच्या चाहत्यांना अखेरपर्यंत वेदना देत राहणार.... वेदनेचा होम करीत अभिनयाचा वेद निर्मिणारा तो एक जगात कुठेही शाखा नसलेला अननुसरणीय माणूस होता...
दिलीप म्हैसाळकर
त्यांच्यावर तसे आजवर अनेकानेकांनी भाष्य केलंय पण गीतकार/संवाद लेखक जावेद अख्तर यांनी जाहिरपणे जे बोलून ठेवलंय ते खरं आणि अमिट असं आहे... असंख्य भारतीय चित्रपट 'बफ'चीच ती प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे..., असं आपण मानलं पाहिजे.... लता मंगेशकर यांनीही जे दिलीपकुमार यांच्या बद्दल जे म्हणून ठेवलंय ते पुसून टाकता येणार नाहीच... चित्रपट सृष्टीत असा भारतीय माणूस/कलावंत कल्पांतापर्यंत पुन्हा होणे नाही
Comments
Post a Comment