फिर दिलीप कुमार....
दिलीप कुमार वर लिहिणे सोपे नाही...तो अख्खा हाती सापडावा असे वाटल्यास त्याच्या डोळ्यात शिरावे.. शक्य असल्यास ते खुडून घ्यावे... त्याचे मौन वाचून कळते का ते बघावे...
शाळकरी वयात संगदिल बघितला...(किती वेळा... सांगायची लाज वाटते) नायक गात असतो आणि त्याच्या अभिनयाचं बिंब कॅमेरा नायिकेच्या मुखकमळावर असूनही स्पष्ट उमटलेलं दिसत होतं.... खुर्चीत सावरून बसण्याशि वाय पर्यायच नसतो... दिलीप साब फार सायलेंटली तुमचा कब्जा घेतात ते तुमच्याशी कधीही फारकत न घेण्याच्या अटींवर....
अनेकांना वैजयंती मालाबरोबर त्यांची जोडी आवडते.. केमिस्ट्री जुळते म्हणा ना... वहिदा सोबतच्या या जोडगोळीचा
मरंद गंध खासा न्यारा.. त्यांचे चित्रपट बघताना नटाने न करावयाच्या बाबींचा त्यांनी सखोलतेने विचार केल्याचं जाणवतं.. वाट्याला आलेली भुमिका अंडरप्ले करताना ते त्या भूमिकेचे होत ते बघणं हे शब्दातीत आणि अनुपमेय सोहळा असे... त्यांचं टायमिंग मॅचलेस होतं... त्यामुळेच अशोक सराफ सारख्या व्हर्सेटाइल नटाच्या टायमिंग चं त्यांना कौतुक करता आलं.....
दिलीपकुमार यांना बहुतेक सगळे महत्वाचे पुरस्कार मिळूनही महत्वाचे म्हणजे सिनेप्रक्षकांचं उदंड प्रेम मिळालं....हे स्वीकारले जाणे...याचा एक अर्थ समाज पुरूषाने स्वीकारणं असाही आहे...वंशवेल न रुजवताच त्याला हा प्रवास शंभरी गाठायच्या आत आटोपता घ्यावा लागला हे वास्तव त्याच्या चाहत्यांना जसं दु:खीकष्टी करु शकतं तसं ते त्याला वेदनेचे किती दशावतार भोगायला लावीत राहिले... या नुसत्या कल्पनेने काळीज पिळवटून निघतं... मुंबई चा शेरीफ राहिलेला हा हाडामासाचा जिवंत माणूस आज लौकिक अर्थाने आपल्यात नाही हे पचवणं फार जड जातंय.. शेवटी काही दु:खावेग मनातच राहणार... ते व्यक्त करायला असमर्थ आहोत आपण....
नेहरुवियन कालखंडाच्या नायकाचा प्रातिनिधिक चेहरा असा त्याला अभिप्राय मिळूनही आरोग्याला घातक अशा सध्याच्या एवढ्या रोगट गलबल्यात सरकारचे डोके शाबूत असल्याचा निर्वाळा त्याला राज्याची अधिकृत मानवंदना दिल्या गेली तेंव्हा मिळाला.... दुसर्या जीवावर कुणी हळुवार फुंकर घालतात असं वाटत राहिलं.
दिलीप साब शी निकाह कुबुल करीत ते जाई पर्यंत सातव्या आसमां वर कोहिनूर मिळाल्याच्या अवर्णनीय आनंदाच्या काळात वावरत त्यांना अखेरपर्यंत साथ करणार्या सायराजींना त्यांचे जाणे सहन करण्याचे बळ मिळेल... अशी परवरदिगारकडे हात जोडून प्रार्थना करू...
" यह मर्तबा बलंद मिला, जिसको मिला..
हर मुद्दईके वास्ते दारोरसन नही"
दिलीप म्हैसाळकर
Comments
Post a Comment